राजकीय क्षेत्रात ऐतिहासिक अशा काही लढती असतात. त्या घडत असताना आणि घडून गेल्यावर देखील त्याची चर्चा वेगवेगळ्या स्तरावर सुरू असते. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही अशीच काही ऐतिहासिक वळणे घेऊन झाली आणि निकाल लागूनही काही गोष्टी जाणीवपूर्वक समाजमनात पेरण्याच्या क्लुप्त्या सुरू झाल्या. ही पोटनिवडणूक काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव यांनी भाजपाचे सत्यजीत कदम यांचा १९ हजार मतांनी पराभव करून जिंकली.
निवडणुकीत जशी यशाची काही मोजमापे असतात, तसेच पराभवाचे देखील एक आपापले विश्लेषण असते. पराभूत झालेला पक्ष एका कचाट्यात सापडलेला असतो आणि यातून सुटका करण्यासाठी तो स्वतः काही ” मिथके ” पसरवतो, जेणेकरून पराभवाची चव पूर्णपणे कडवट राहणार नाही आणि भविष्यातील संधी टिपण्यासाठी काही प्रश्न उभे करून आपल्या मतदारांना एक भ्रामक का होईना पण आधार पुरवला जाईल. कोल्हापूरच्या ऐतिहासिक निवडणुक नंतर असेच काही घडले आणि मग पराभूत झालेल्या भाजपने उभ्या केलेल्या काही प्रश्नांवर मत मांडणे आवश्यक ठरले. मला जाणवलेले काही महत्त्वाचे प्रश्नच इथे चर्चेला घेतोय.
वाढीव मते कुणाची ?
पराभूत झालो तरीही तीन पक्षांविरोधात लढूनही आमची मते वाढली म्हणजे आमचा विजयच आहे….कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे हे वक्तव्य आहे. यासाठी आधार म्हणून २०१४ साली भाजपला मिळालेली ४० हजार मते आणि यावेळी मिळालेल्या ७८हजार मतांचा दाखला दिला जातोय. वरकरणी हे खरे व योग्य वाटेल देखील, पण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि तिचे अंतरंग बहिरंग वेगळे असतात, हे समजून घ्यायला हवे. यावेळी मिळालेली वाढीव मते म्हणजे सर्वच्या सर्व काही भाजपच्या कायम मतदारांची आहेत का ? नक्कीच नाहीत . सध्याचे भाजपचे उमेदवार हे मागील दोन निवडणूकीपूर्वी चक्क काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते, त्यावेळी त्यांना ४७ हजार असे मतदान झाले होते. भाजपचे विश्लेषण खरे मानायचे तर मग सध्याच्या काँग्रेस उमेदवारांना मिळालेली तब्बल ९६ हजार मते हे कशाचे द्योतक मानावे ? सांगण्याचा मुद्दा असा की, भाजप उमेदवार सत्यजीत कदम हे गेली किमान १० वर्षे कोल्हापूर उत्तरच्या आमदारकीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सातत्यात त्यांनी कोल्हापूरमध्ये काही आवश्यक जोडण्या नक्कीच केल्यात. याचा अर्थ इतकाच की सध्याच्या भाजपच्या वाढत्या मतात त्यांच्या उमेदवारीचा वैयक्तिक वाटा मोठा आहे आणि याचे श्रेय चद्रकांतदादा भाजपच्या नावावर घेत आहेत. भाजपचा मतदार नक्कीच एवढा फुगला असेल तर दोन वर्षात येणाऱ्या निवडणुकीमध्ये मूळचा भाजपचा असलेला एखादा उमेदवार देऊन पडताळणी करावीच. दूध का दूध पाणी का पाणी होईल. खरेतर पुढील निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सत्यजीत कदमच असतील याची खात्री काय ? खुद्द चंद्रकांतदादांनीदेखील पराभवाच्या विश्लेषणात ही गोष्ट टाळलीय याची नोंद घ्यायला हवी. तेव्हा भाजपचे वाढलेले मताधिक्य हे खूपच अल्प असून उमेदवार सत्यजीत कदम यांच्या मतदरसंघातील संपर्काचा वाटा सिंहाचा आहे हे नाकबूल करु नये.
शिवसेनेने मतदारसंघ गमावला?
शिवसेनेची मते फुटली आणि त्यांनी हक्काचा मतदारसंघ गमावला, असे जाणीवपूर्वक पेरले जातेय. वस्तुस्थिती विचारात न घेता असे बोलणे दिशाभूल करणारे आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा हा मतदारसंघ हा कधीच भाजपचा नव्हता. साधारणपणे १९९० पर्यत शेकापचे वर्चस्व इथे होते. त्यानंतर आलटून पालटून कॉग्रेस व शिवसेनेने इथे विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून चंद्रकांत जाधव यांनी हा मतदारसंघ कॉग्रेसकडे खेचून आणला. शिवसेनेने हा मतदारसंघ गमावला असे म्हणण्यामागे स्वतःच्या मतदारांना जपणे हाच उद्देश आहे. दोन वर्षानी महाविकास आघाडी अंतर्गत होणाऱ्या या प्रश्नांची चर्चा आतापासून करण्यात फक्त भाजपाशिवाय इतर कुणालाही रस नाही आणि फायदाही नाही. भविष्यात कदाचित शिवसेनेला हा मतदारसंघ दिला देखील जाईल अथवा दुस-या मतदारसंघाची तडजोड शिवसेना स्वीकारेल. पण शिवसेनेने मतदारसंघ गमावला असे कोण सांगतेय तर ज्यांना कोल्हापूरमधील १० मतदारसंघात एकही विजय मिळवता आला नाही ते?
दुसरे म्हणजे शिवसेनेची मते फुटली व हिंदुत्ववादाच्या नावावर भाजपला मिळाली, असे म्हणणे म्हणजे पुन्हा दिशाभूल करणेच आहे. खरेतर जगातील कोणताही राजकीय पक्ष आपल्या मतांची खात्री पटवू शकत नाही . कारण प्रत्येक राजकीय पक्षाला असणाऱ्या काही मर्यादित चौकटी. राजकीय पक्षाची स्वतःची अशी अल्प मतपेटी असते. त्याव्यतिरिक्त खूप मोठे मतदान लोकांच्यात जाऊन मिळवायचे असते. याचकारणे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार हे लोकांच्यापर्यत हात जोडून मतदान करण्याविषयी याचना करत असतात. हे मतदान व मतदार प्रत्येक वेळी तुमचेच असतील याची खात्री कुणी देऊ शकत नसतो. मागील निवडणुकीत पडलेली मते यावेळी घटतील अथवा वाढतील हा त्या त्यावेळच्या परिस्थितीचा आणि यंत्रणेचा भाग असतो. अशावेळी शिवसेनेची मते फुटली याला फारसा अर्थ नसतोच. काही मते प्रत्येक राजकीय पक्षांची दरवेळी इकडेतिकडे होत असतात हे वास्तव आहे. केवळ आकडेवारीवर आधारित ढोबळ विश्लेषण चुकीची मते तयार करत असते. अगदी तेच या मुद्द्याबाबत आहे. सध्या निवडून आलेल्या काँग्रेसच्या जयश्रीताई जाधव ह्या प्रत्यक्षात होत्या भाजपच्या नगरसेविका. याचा अर्थ जिथे खुद्द भाजप नगरसेविकाच महाविकास आघाडीच्या बाजूला आल्यावर भाजपने शिवसेनेच्या काही फुटलेल्या मतांकडे बोट दाखवणे कितपत योग्य ?
चंद्रकांतदादांनी पुन्हा यावे..
निवडणुकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी खूप मुक्ताफळे उधळली. याचा समाचार त्या त्या वेळी अनेक जणांनी घेतलाय. ही निवडणूक ऐतिहासिक ठरताना दोन्ही बाजूकडून झालेल्या आर्थिक उलाढाली दुर्लक्षित करता येत नाहीत. शिवाय मोठी यंत्रणा दोन्ही बाजूने कामाला होतीच. तरीही मोठ्या फरकाने भाजपला पराभव चाखावा लागला याचे शल्य चंद्रकांतदादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतेय. पराभवाची निराशा व दुःख लपवून ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना भुलवत ठेवण्यासाठी वरील काही अवास्तव वाक्ये त्यांनी बोलून दाखवली. त्यांची निराशा समजून घेण्यासारखे आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांना कोल्हापूरकरांनी पराभवाची चव दाखवत, कोल्हापूरकर बिघडलेले नसून, बिघडलेल्यांना त्यांची राजकीय जागा दाखवून सुधारण्याची संधी दिली आहे. दुसरे असे की, सत्यजीत कदमांपेक्षा मी उमेदवार असतो तर काय झाले असते, अशी दर्पोक्ती त्यांनी केलीय. खरेतर अवघ्या दोनच वर्षांत स्वतःचे वाक्य आजमावून पाहण्याची संधी चंद्रकांतदादांना आहे. तेव्हा २०२४ साली त्यांनी मनाचा निर्धार करून कोल्हापूरमध्ये यावे म्हणजे त्यांना त्यांची राजकीय स्पेस नेमकी केवढी आहे याचे प्रत्यंतर येईल. हे आव्हान समजावे त्यांनी ….कोल्हापूरकर अशा आव्हानाकरता सदैव तयार आहेत.
सरजी भाजप + महाडीक परिवार ( गेली १५ वर्षे महानगर पालिकेतील महाडीकांचा गल्ली बोळातील आजी-माजी नगरसेवक ) संपर्कात आहे.मताधिक्य भाजपचा नसून महाडीक परिवारांचा आहे