काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. कोण वाचेल, कोण समजून घेईल, मला माहित नाही. तरी सांगावे लागेल, कारण सांगणे आवश्यक आहे.
१.मी यापूर्वी अनेकदा लिहिले आहे. हा काळ वैचारिकदृष्ट्या उपेक्षित समाजातील सर्वात खुळचट लोकांच्या सक्षमीकरणाचा काळ आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेत भाग घेण्याची ज्यांची कुवत नाही, अशा लोकांना आपण सर्वात हुशार असल्याची जाणीव करून दिली आहे. तुम्ही बहुसंख्य आहात आणि समाजातील जास्तीत जास्त लोक जे बोलतात ते कधी चुकीचे असू शकत नाही. जे तुम्हाला चुकीचे समजत आहेत ते तुमचे शत्रू आहेत, म्हणून शस्त्रे उचला आणि त्यांना तुडवा.
२.आता प्रश्न असा आहे की, संख्याबळाने अधिक असलेल्या मूर्ख लोकांचे सशक्तीकरण सध्या होत आहे तसे यापूर्वी का झाले नाही? याचे थेट कारण म्हणजे आधीच्या पिढ्यांमधील उजव्या विचारसरणीचे नेतृत्व करणारे लोक सुशिक्षित होते आणि त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात काहीएक नैतिकता जिवंत होती. मूर्ख आणि अडाणी लोकांच्या गर्दीचे मतदारांच्या समूहात करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांना त्यांच्यासारखे दिसायचे नव्हते. तसे करायला त्यांना संकोच किंवा लाज वाटत होती.
३.सध्याचा काळ निरंकुशतेचा आहे. मग ते ट्रम्प असोत, बोल्सोनारो किंवा आपले श्रीमान भाग्यविधाते. लोकांना एकत्र करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या आधुनिक जगातल्या नेत्यांचे असे नमुने जगात याआधी कधीच दिसले नाहीत. हे नेते अनेकदा बौद्धिक पातळीवर त्यांच्या समर्थकांसारखे दिसतात. दिवसभरात असंख्य वेळा खोटे बोलतात आणि हास्यास्पद ठरण्याइतपत अतार्किक बोलत असतात. समाजातील सुशिक्षित वर्ग काय विचार करतो, यामुळे त्यांना काहीएक फरक पडत नाही. कारण मूर्ख लोकांच्या सक्षमीकरणातून आपल्याला वर्षानुवर्षे संपणार नाही असा खजिना सापडला आहे, याची त्यांना खात्री असते.
४.भांडवलशाही जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये शक्यतो आपल्या सर्वाधिक विकृत स्वरूपात आहे. त्यामध्ये माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे अनैतिक नाही आणि फसवणूकसुद्धा मान्य आहे. सध्याचे राजकारण केवळ भांडवलशाहीतून काही शिकण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. भांडवलशाहीबरोबर एक अतूट युती निर्माण करण्यासाठी ते रात्रंदिवस नवनवीन फॉर्म्यूले शोधते आहे.
५.मानवजातीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी ताकदवान बनलेली मूर्ख मंडळी काय करत आहेत? स्वतःच्या नव्या ओळखीने त्यांना एक वेगळाच आत्मविश्वास दिला आहे. ही मंडळी आपल्या आजूबाजूला शत्रू शोधत आहेत. त्यांचा तर्क असा आहे की जर शेपटीला आग लागली आहे, तर मग लंका कशी काय मिळणार नाही? लंका सापडली नाही तर ते वाटेल तिथे आग लावत सुटतील. बहुसंख्येचे तांडव नुकतेच सुरू झाले आहे, ते संपूर्ण जगात तीव्रतेने पसरत जाईल. आणि एका उंचीवर पोहोचल्याशिवाय ते थांबणार नाही.
(व्यंगचित्र Green Humour वरुन साभार)