विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. काँग्रेसच्या एका उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारतीय जनता पक्षाच्या श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी ३० मते मिळाली. प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे या २६ आणि प्रसाद लाड यांना १८ पहिल्या पसंतीची मते मिळाली. म्हणजे इथेही आपल्याकडे अधिकृत मते कमी असताना भाजपने राज्यसभेप्रमाणेच आपल्या दोन उमेदवारांना चार चार जास्ती मते दिली. ज्याचा फायदा सहावा उमेदवार निवडून येण्यामध्ये झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे नाईक निंबाळकर यांना २९ आणि एकनाथ खडसे यांना २८ मते मिळाली. शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना प्रत्येकी२६ मते मिळाली. काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांना २२ तर भाई जगताप यांना १९ पहिल्या पसंतीची मते मिळाली.
राज्यसभेचा पहिला धक्का
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर मात केली. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडी गाफील होती. तिथे आघाडी फक्त पहिल्या पसंतीच्या मतांवरच अवलंबून राहिली. पहिल्या पसंतीच्या मतांवरच आपले सर्व उमेदवार निवडून येऊ शकतील, अशा भाबड्या समजुतीत आघाडीचे मातब्बर नेते राहिल्यामुळे नियोजनामध्ये मार खाल्ला. आघाडीतील प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यापुरतेच प्रयत्न केले. पक्षांचे मतदान उघड असल्यामुळे काही दगाफटका झाला नाही. त्यामुळे अधिकृत पक्षांच्या मतांवर अवलंबून असलेले अधिकृत उमेदवार निवडून आले. अपक्षांच्या भरवशावर ज्यांच्या विजयाची अपेक्षा होती, त्या संजय पवार यांचा पराभव झाला. आघाडीच्या गोटातल्या दहा अपक्षांना फोडण्यात भाजपला यश मिळाले. भाजपचे १०६ आणि अपक्ष ७ असे संख्याबळ भाजपकडे असताना भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपने आघाडीची दहा मते फोडली. आपले चौथे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी पहिल्या पसंतीची मते कमी असतानाही त्यांनी दुस-या क्रमांकाच्या मतांचे नियोजन केले. दुस-या पसंतीची मते प्राधान्याने मिळवण्यासाठी आपल्या दोन उमेदवारांच्या मतांचा कोटा वाढवला. अत्यंत बारकाईने नियोजन करून आपला चौथा उमेदवार निवडून आणला. महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला.
अधिकृत मतेही फुटली
राज्यसभेचा अनुभव ताजा असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अधिक सावध राहतील, अशी अपेक्षा होती. दोन-तीन दशकांचा राजकीय अनुभव असलेले नेते महाविकास आघाडीकडे आहेत. असल्या अनेक निवडणुकांचा खेळ खेळलेली मंडळी आहेत. ती मैदानात उतरली तर देवेंद्र फडणवीस यांची डाळ शिजू देणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, विधानपरिषदेच्या निकालानंतर कुणाकडे कौशल्य आहे ते कळेल, असे विधान करून भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अपक्ष आमदारांशी संवाद वाढवला होता. परंतु त्याचा काही उपयोग झालेला दिसून आला नाही. उलट शिवसेनेचीच काही मते फुटल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ५२ मते पडली आहेत. शिवसेनेच्या अधिककृत संख्याबळापेक्षा तीन मते कमी असल्यामुळे तीन मते फुटल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. आता शिवसेनेने ठरवून दिलेल्या कोट्याएवढीच मते आहेत की खरोखर मते फुटली आहेत, हे शिवसेनेच्या मतांचे नियोजन करणारांनाच ठाऊक असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शिवसेनेची बैठक बोलावली आहे, यावरून मामला गंभीर असल्याचे समोर येते. शिवसेनेचे अधिकृत आमदार फुटणे ही शिवसेनेसाठी मोठी नामुष्की आहे. अशी गद्दारी करणा-यांसंदर्भात शिवसेना भूतकाळात फार कठोर वागली आहे. उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे बघावे लागेल.
एकटे फडणवीस सगळ्यांना भारी
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना एकूण मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांची संख्या १३३ आहे. याचा अर्थ राज्यसभेला पडलेल्या मतांपेक्षा अधिक दहा मते भाजपने यावेळी मिळवली आहेत. राज्यसभेनंतर महाविकास आघाडीचे नेते सावध होते. विरोधक सावध असताना त्यांच्या गोटात छेद देणे ही फार मोठीच गोष्ट आहे आणि भाजपने ती करून दाखवली आहे. त्याचे विश्लेषण करताना घोडेबाजार वगैरे वगैरे म्हटले जाईल. प्रत्यक्षात भाजपने निवडणूक जिंकली आहे आणि महाविकास आघाडीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही निवडणूक नव्हती तर प्रतिष्ठेची लढाई होती. कोणत्याही मार्गाने ती जिंकण्याला महत्त्व होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाटबंधारे मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले अशा अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीशी जोडली होती. आठ-दहा अपक्ष आमदारांना बांधून ठेवणे आणि आपला उमेदवार निवडून आणणे एवढ्यापुरते हे मर्यादित होते.
समन्वयाच्या अभावामुळे पराभव
महाविकास आघाडीच्या दोन्ही पराभवांचे प्रमुख कारण म्हणजे समन्वयाचा अभाव. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीला सत्तेच्या फेविकॉलने चिकटून ठेवले आहे, परंतु ते सत्तेपुरतेच. त्यापलीकडे जी एकसंधता, एकजिनसीपणा, परस्परविश्वास, परस्परसंवाद आघाडीत असायला हवा होता, त्याचा अभाव दिसतो आहे. दोन्ही निवडणुकांच्यावेळी प्रत्येक पक्षाने आपापल्या पातळीवर प्रयत्न केले. आघाडी म्हणून संयुक्तपणे निवडणुकीला सामोरे जाताहेत, असे चित्र अभावानेच दिसले. सत्तेत येऊन अडीच वर्षांचा काळ लोटला तरी तिन्ही पक्षांना परस्परांचा विश्वास संपादन करता आलेला नाही. नाना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी स्वबळाच्या बेटकुळ्या दाखवून हसे करून घेतात. त्यांच्यासारख्या बोलघेवड्या नेत्याला या निवडणुकीत मोठी चपराक बसली आहे. काँग्रेस नेत्यांच्या सुंदोपसुंदीत चंद्रकांत हांडोरे यांचा बळी गेला. हांडोरे यांचा पराभव आणि भाई जगताप यांचा विजय यामध्ये भाई जगताप यांचे काही कारस्थान नाही, हे स्पष्ट दिसते. हांडोरे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी नेमलेल्या पक्षाच्या तीन आमदारांनीच विरोधी मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमून दिलेल्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये हांडोरे निवडून येणारच होते. त्यामुळे दुस-या क्रमांकाचे उमेदवार असलेल्या भाई जगताप यांना दुस-या पसंतीक्रमाची मते देण्यात आली होती. त्याचा फायदा जगताप यांना झाला आणि ते हांडोरे यांच्या पुढे निघून गेले. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसचे आमदारही फुटले. दुसरीकडे एकनाथ खडसेही, भाजपमधील काही आमदारांनी आपल्याला मते दिल्याचे सांगताहेत. ते खरे मानायचे तर राष्ट्रवादी काँग्रेसची मतेही फुटल्याचे मान्य करावे लागेल. याचा अर्थ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील आमदारांना गळाला लावण्यात यश मिळवले. राज्यसभेचे मतदान उघड नसते तर त्याचवेळी हा धक्का बसला असता.
कोल्हापूरचे `सतेज` मॉडेल
भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणूक गांभीर्याने लढवतो. त्यांचा मुकाबला सहज शक्य होत नाही. त्यासाठी थेट रणमैदानात उतरावे लागते. भाजपच्या विरोधात निवडणूक कशी लढवायची असते, त्याचे प्रात्यक्षिक गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवून दिले. भाजपने आपली सगळी ताकद उतरवली असतानाही सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे मैदान मारले होते. तशी जिद्द आणि लढावू बाणा महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यान राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीत दाखवला नाही. आपापल्या पक्षापुरते पाहिले. देवेंद्र फडणवीसांना पराभूत करण्याची इच्छाशक्ती कुणीच दाखवली नाही. त्यामुळेच सलग दुस-या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन्ही निवडणुकीतील विजयाचा आत्मविश्वास घेऊन भारतीय जनता पक्ष मैदानात उतरेल. तेव्हा त्यांचा मुकाबला करण्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे आणि नेत्याकडे असणार नाही.